गॅझेट्सची दुनिया !
जागतिक स्तरावर ज्या समस्येला सामोरे जावं लागत आहे ती म्हणजे गॅझेट्सची दुनिया !!! अनेक शास्त्रज्ञांच्या मते मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासावर गॅझेट्सचा परिणाम झाला आहे. एका गॅझेटमुळे नव्हे तर गॅझेट्सच्या दुनियेमुळे परिणाम झाला आहे. व्हिडीओ गेम, कॉम्प्युटर्स, सेलफोन, आणि अवतीभोवती असणारी अनेक यंत्रे यामुळे एक गॅझेट्सची दुनिया तयार झाली आहे. ह्या सर्वांचा पहिला फटका बसला तो पालक आणि मुलांच्या नात्याला आणि त्यांच्यामधील संवादाला!
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे विचार, अनुभव, संस्कृती संवादाच्या माध्यमातून पोहोचवणे आवश्यक आहे तेच गॅझेट्समुळे मागे पडत जात आहे. त्यामुळे मुलांना मोठ्यांविषयी असणारा आदर, मातृभाषा, देशभक्ती ह्या फक्त कल्पना वाटू लागल्या आहेत. कल्पना, अपेक्षा आणि वास्तव यामधील पुसटशी असणारी रेषा दाखवून देणारे दूर झाल्याने मुलांचा वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे.
वाढत्या वयात मुलांचे वैचारिक पोषण न झाल्याने रागावर नियंत्रण मिळवणे, ध्येयनिश्चिती, भावनाशीलता, एकाग्रता नसणे यांसारखे धोके निर्माण झाले आहेत. दुसरीकडे गॅझेट्सच्या वापराने एका विशिष्ट स्पीडची त्यांना सवय होते. सर्व काही इन्स्टंट हवं असतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो यावरच विश्वास उडतो आणि हीच सवय आयुष्यात प्रत्येक गोष्टीत लागू होऊ लागते. त्यामुळे नैराश्य येणे, आत्मविश्वास कमी होणे, स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे असे दुष्परिणाम दिसू लागतात.
गॅझेट्स मुळे फक्त नुकसान झाले असे मुळीच नाही. पण ज्या प्रमाणात फायदा झाला त्यापेक्षा अधिक नुकसान पुढच्या पिढीला होणार असेल तर ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी म्हणण्याची वेळ पालकांवर येईल.
गॅझेट्सपासून दूर करून तोंडी आकडेमोड करणे, वाचन, खेळ, फिरणे याचबरोबर नात्यातील गांभीर्य, मैत्रीतील मज्जा, देशप्रेम, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, प्रसंगावधान, चूक बरोबर ठरवणे, निर्णयक्षमता यांसारख्या वास्तव जीवनाशी निगडीत बाबी त्यांना कळल्या पाहिजेत तेव्हाच त्यांनाही जीवन जगण्याचा आनंद मिळेल. नाहीतर आयुष्य फक्त एका गेमप्रमाणे खेळलो आणि संपले असं होऊन जाईल.
विजय सोनवणे
९९२०२०४७२७ , vijay@arrham.org