मम्मी कि पाठशाला !!! Emotional Intelligence for Mothers
“माझ्या मते आई हि आदरणीय व्यक्ती आहे आणि तुम्ही जर पगाराबद्दल बोलत असाल तर पगार नेहमी पैशात मोजता येत नाही. मला वाटत कि प्रेम आणि आदर तुम्ही एखाद्याला देता तो पगारापेक्षा अधिक महत्वाचा असतो. माझी आई माझ्या आयुष्यातील खूप मोठी प्रेरणा आहे. आई हि मुलांसाठी खूप त्याग करत असते. त्यामुळे आईचं काम करणारी स्त्री मोठा पगार घेण्यास अधिक पात्र आहे.” असे आईविषयी सन्मानपूर्वक बोलून मानुषी छिल्लर हिने मिस वर्ल्ड २०१७ चा खिताब आपल्या नावे करून घेतला.
श्लोकांमध्ये सुद्धा आईला कल्पतरूची उपमा दिली आहे. मुलांच्या जन्मापूर्वी पासून त्यांना लहानच मोठं करण्यापर्यंत आई जे काही अपरिमित परिश्रम करत असते त्याचे मोल करताच येत नाही. पण ‘आई’ म्हणून जगत असतांना ती एक स्त्री सुद्धा असते, स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिला स्वप्नांशी शर्यत करायची असते. तिनेच विणून ठेवलेल्या नात्यांच्या विणेला तिला घट्ट करायचं असतं. तिच्या महत्त्वकांक्षेला क्षितीज खुणावत असतं पण तिचे पंख पिल्लांना उब देण्यात व्यस्त असतात.
मागील पिढीपर्यंत मुलांना वाढवण्याची जबाबदारी घरातील सर्वजण घेत होते कारण एकत्र कुटुंब पद्धती होती. आता मात्र मुलांची जबाबदारी आईची असते. २१व्या शतकाने स्त्रीला प्रगतीच्या अनेक वाटा दाखवून दिल्या खऱ्या, पण तिला मदत करणारे मदतीचे हात मात्र तिच्यापासून हिरावून घेतले. मुलींनी शिक्षण घ्या, नोकरी करा, हवे ते कपडे घाला पण संसार करण्याची मोनोपॉली फक्त तिच्यासाठीच आहे.
संसार करतांना मुलांचे संगोपन करतांना येणाऱ्या असंख्य अडचणींना तिला सामोरं जायचं आहे. त्याशिवाय स्वतःच्या रागाचे, वेळेचे, जबाबदारीचे, कामाचे योग्य नियोजन तिला करायचे आहे. आई म्हणून मुलांना उत्तम नागरिक बनायचे धडे देण्या आधी तिला ते धडे गिरवायचे आहेत. संस्कारांच्या नावेतून मुलांनी पैलतीर पार करावा असे वाटत असतांना; आधी तिला नावाड्या बनावे लागणार आहे. मुलांना संवेदनशील बनवतांना; असंख्य जाणीव ज्या तिच्या मनात आहेत त्यांना वाट मोकळी करून द्यायची आहे.
डॉक्टर, इंजिनिअर, वकील बनवायची अनेक विद्यापीठ आहेत. पण आई म्हणून जबाबदारी कशी सांभाळायची? मुलांच्या संगोपनात स्वतःची भूमिका कशी असली पाहिजे? संसार-मुलं-करिअर यांचा मेळ कसा घालावा? स्वतःच्या दोषांना आवरून गुण संवर्धन कसे करावे? यासारख्या असंख्य गोष्टी आई होण्यासाठी शिकणे गरजेचे आहे. त्यासाठी “मम्मी कि पाठशाला” होणे गरजेचे आहे.
आईला भावनिक नियमन करण्याची गरज आहे. भावना ह्याचा थेट संबंध आपल्या आयुष्याशी असल्याने त्या भावनांचे योग्य नियमन करणे गरजेचे आहे. भावनांच्या चढ उतारांमुळे शरीरात होत असलेले रासायनिक (केमिकल) बदल सातत्याने दिसून येतात. ह्याचा परिणाम विचार, वागणं, आणि कृतीवर होत असतो. ह्या सर्वांचा अप्रत्यक्षपणे परिणाम आपले आरोग्य, राहणीमान, नातेसंबंध, कार्यक्षमता, निर्णय घेणे यांवर होताना आपण पाहू शकतो. भावनेच्या असंतुलनामुळे घरातील, तसेच घराबाहेरील वातावरणावर सुद्धा होतो. एक आई म्हणून तुम्ही एक महत्वाची भूमिका पार पडत असता. त्यामुळे तुमचे भावनिक आरोग्य सुदृढ असणे अधिक महत्वाचे आहे.
“Emotional Intelligence (EQ) for Mothers” ह्या आमच्या छोट्याशा कार्यक्रमामधून तुम्ही मानसिक ताणतणाव कसा नियंत्रित करायचा, स्वतःच्या नियंत्रणात कसे राहायचे, निराशेच्या प्रसंगांना सहन कसे करायचे, आपली कार्यक्षमता कशी वाढवायची आणि स्वतः आनंदी कसे राहायचे अशा अनेक प्रकारे तुमच्या भावनिक नियमनासाठी आपण वर्कशॉप म्हणजे “मम्मी कि पाठशाला” घेणार आहोत.
@ विजय सोनावणे, 9920204727